पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 2 ऑक्टोबर 2021रोजी सकाळी 11 वाजता, जल जीवन मिशन या विषयावर ग्राम पंचायती तसेच जल समिती/ग्रामजल आणि स्वच्छता समितींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
संबंधितांमध्ये जागरुकता येण्यासाठी आणि मोहिमेअंतर्गत येणाऱ्या योजनांमधे अधिक पारदर्शकता आणण्यासाठी तसेच त्याची कार्यवाही उत्तम रितीने पार पाडण्यासाठी पंतप्रधान जल जीवन मिशन ॲपचेही उद्घाटन करणार आहेत.
यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय जल जीवन कोष याचाही प्रारंभ करणार आहे, ज्यायोगे (ज्या माध्यमातून)कोणतीही भारतातील किंवा परदेशांतील मानवहितवादी व्यक्ति, संस्था अथवा कंपनी, प्रत्येक ग्रामीण घरात, शाळा, अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा यांना नळाचे स्वच्छ पाणी मिळण्यासाठी मदत करण्यास योगदान देऊ शकते.
यानिमित्ताने संपूर्ण देशभरात सर्वत्र जल जीवन संदर्भात ग्राम सभांचे आयोजन देखीलयावेळी करण्यात आले आहे. ग्रामसभेत ग्रामीण पाणीपुरवठा प्रणाली नियोजन आणि व्यवस्थापन तसेच दीर्घकालीन पाणी सुरक्षितता यावर देखील यावेळी चर्चा होईल.
जल समिती / ग्राम जल आणि स्वच्छता समित्या (व्हीडब्लूएससी VWSC) बद्दल :
गावातील पाणीपुरवठा प्रणाली नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, कार्यवाही आणि देखभाल करून जलसमित्या नियमितपणे, दीर्घकाळ प्रत्येक घरासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
6 लाखांहून अधिक गावांपैकी, सुमारे 3.5 लाख गावांमध्ये जलसमिती / व्हीडब्लूएससीची स्थापना केली गेलेली आहे. फील्ड टेस्ट किट (विभागीय चाचणी साधने)वापरुन पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यासाठी 7.1 लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जलजीवन मिशन:
15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधानांनी प्रत्येक घराला स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळाद्वारे पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशनची घोषणा केली. मिशनच्या सुरुवातीला, केवळ 3 कोटी 23 लाख (17%)ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असे.
कोविड -19 महामारीचा प्रभाव असूनही गेल्या दोन वर्षांत 5 कोटीहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. आजच्या तारखेपर्यंत 8 कोटी 26 लाख (43%) ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या घरांमध्ये पाणीपुरवठा होत आहे. 78 जिल्ह्यातील 58 हजार ग्रामपंचायती आणि 1लाख 16 हजार गावांमधील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पाणी पुरवठा होत आहे. आतापर्यंत, 7 लाख 72 हजार (76%) शाळा आणि 7 लाख 48 हजार (67.5%) अंगणवाडी केंद्रामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला आहे.
'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास', सबका प्रयास आणि 'तळागाळावर लक्ष' केंद्रित करणे या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून, राज्यसरकारांच्या सहकार्याने 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत जल जीवन अभियानासाठी 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी 3 कोटी 60 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.