नीती आयोग आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने आयोजित वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
भारत कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आणि एलएनजी आयात करणारा चौथा मोठा देश असून जागतिक तेल आणि वायू क्षेत्रात महत्वाचा देश आहे. जागतिक तेल आणि वायू मूल्य साखळीत निष्क्रीय ग्राहकांकडून सक्रिय आणि व्होकल हितधारक बनण्याची गरज लक्षात घेऊन नीती आयोगाने जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पंतप्रधानांबरोबर 2016 मध्ये पहिली बैठक आयोजित केली होती.
जागतिक तेल आणि वायू क्षेत्राला आकार देणारे सुमारे 45-50 जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख हितधारक दर दोन वर्षांनी एकत्र जमून पंतप्रधानांशी संवाद साधतात आणि समस्या व संधींबाबत चर्चा करतात. वार्षिक जागतिक सीईओच्या संवादाचा प्रभाव चर्चेची तीव्रता, सूचनांची गुणवत्ता आणि गांभीर्याने केलेली कारवाई यातून दिसून येते.
नीती आयोग आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने आयोजित केलेला हा 5 वा कार्यक्रम आहे. यावर्षी तेल आणि वायू कंपन्यांचे सुमारे 45 मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
भारतीय तेल वायू साखळीत गुंतवणूक वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती जाणून घेणे, सुधारणांवर चर्चा, रणनीतींची माहिती देणे हा या बैठकी मागील उद्देश आहे. वार्षिक संवाद केवळ बौद्धिक चर्चा नव्हे तर अंमलबजावणी कृतीच्या सर्वात महत्त्वपूर्ण संमेलनांपैकी एक बनला आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश बनला असून तेल व वायू क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे उद्घाटनपर भाषण होईल. त्यानंतर तेल आणि वायू क्षेत्राचा आढावा घेणारे आणि भारतीय तेल व वायू क्षेत्रातील महत्वाकांक्षा व संधी स्पष्ट करणारे सर्वसमावेशक सादरीकरण होईल.
यानंतर जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ज्ञांशी परस्परसंवाद सत्र घेण्यात येईल. डॉ. सुलतान अहमद अल जबर , मुख्य कार्यकारी अधिकारी, अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (एडीएनओसी) आणि युएईचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञान मंत्री . साद शेरीदा अल-काबी, कतार पेट्रोलियमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कतारचे ऊर्जा राज्यमंत्री, उपसभापती, ओपेक ऑस्ट्रियाचे सरचिटणीस मोहम्मद सनुसी बरकिंडो हे तेल व वायू क्षेत्रावरील माहितीसह या सत्राचे नेतृत्व करतील.
रॉसनेफ्ट रशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इगोर सेचीन, बीपी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड लूनी , टोटल एस ए, फ्रान्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पौयांने , आर.आय.एल. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, फ्रान्सचे कार्यकारी संचालक डॉ. फतिह बिरोल, सौदी अरेबियाचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाचे महासचिव जोसेफ मॅक मॉनिगल, आणि जीईसीएफचे महासचिव यूरी सेंटीयुरीन हे पंतप्रधानांना माहिती देतील. लिओन्डेल बासेल, टेलुरियन, स्लमबर्गर, बेकर ह्यूजेस, जेईआरए, इमर्सन आणि एक्स-कोल, इंडियन ऑईल अँड गॅस कंपन्या या प्रमुख तेल आणि वायू कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ज्ञदेखील आपली मते मांडतील.
तत्पूर्वी पंतप्रधान सेरावीकच्या इंडिया एनर्जी फोरमचे उद्घाटन करतील. याचे आयोजन आयएचएस मार्कीट यांनी केले असून ते महत्वपूर्ण माहिती, विश्लेषणे आणि उपायात आघाडीवर आहेत. या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय वक्ते आणि भारत आणि 30 हून अधिक देशातील एक हजार प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे, ज्यात प्रादेशिक उर्जा कंपन्या, ऊर्जा संबंधित उद्योग, संस्था आणि सरकार यांचा समावेश आहे.
उद्घाटन कार्यक्रमातील वक्त्यांमध्ये :
- अब्दुलाझिज बिन सलमान ए.यू. सौद – ऊर्जामंत्री, सौदी अरेबिया आणि
- डॅन ब्रॉउलेट – ऊर्जा सचिव, अमेरिका
- डॉ. डॅनियल यर्जिन – उपाध्यक्ष , आयएचएस मार्किट, अध्यक्ष , सेरा वीक
इंडिया एनर्जी फोरम दरम्यान पुढील मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे – भारताच्या भविष्यातील उर्जा मागणीवर महामारीचा प्रभाव , भारताच्या आर्थिक विकासासाठी पुरवठा सुरक्षित करणे; भारतासाठी उर्जा संक्रमण आणि हवामान कार्यक्रमाचे महत्व, भारतातील एनर्जी मिक्समधील नैसर्गिक वायू: रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स: नवनिर्मितीचा वेग, जैवइंधन, हायड्रोजन, सीसीएस, इलेक्ट्रिक वाहने आणि डिजिटल परिवर्तन आणि; बाजार आणि नियामक सुधारणा: पुढे काय ?