विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी,पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 जानेवारी रोजी, दुपारी साडेबारा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उपस्थितांना ते यावेळी संबोधितही करतील.
विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी, या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी देखील उपस्थित असतील.
15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरूवात झाल्यापासून, पंतप्रधानांनी देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी नियमितपणे संवाद साधला आहे. 30 नोव्हेंबर, 9 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 27 डिसेंबर या दिवशी पंतप्रधानांचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून एकूण चार वेळा संवाद झाला आहे. तसेच, पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात वाराणसी भेटीदरम्यान सलग दोन दिवस (17-18 डिसेंबर) विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी, प्रत्यक्ष संवाद साधला आहे.
सरकारच्या महत्वाच्या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजना पूर्णत्वाला नेण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरु आहेत.
5 जानेवारी 2024 रोजी, यात्रेतील सहभागींच्या संख्येने 10 कोटीचा आकडा पार करत, विकसित भारत संकल्प यात्रेने एक मोठा टप्पा ओलांडला. यात्रेच्या प्रारंभानंतर पहिल्या 50 दिवसांच्या आत पोहोचलेला हा विस्मयकारक आकडा, विकसित भारताच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनातून देशभरातील लोकांना एकत्र आणण्यात यात्रेचा पडणारा सखोल प्रभाव आणि अतुलनीय क्षमता दर्शवतो.