‘जन औषधी दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या- दि. 7 मार्च, 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता जन औषधी केंद्रांचे मालक आणि या योजनेच्या लाभार्थींबरोबर दूरदृष्यप्रणालीव्दारे संवाद साधणार आहेत. याप्रसंगी प्रथम पंतप्रधानांचे मार्गदर्शनपर भाषण होईल, त्यानंतर ते संबंधित लाभार्थींबरोबर संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी ‘जन औषधी- जन उपयोगी’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
जेनरिक औषधांचा वापर आणि जन औषधी योजनेचे लाभ याविषयी जनजागृती करण्यासाठी दि. 1 मार्चपासून देशभरामध्ये जन औषधी सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहामध्ये जन औषधी संकल्प यात्रा, मातृशक्ती सन्मान, जन औषधी बाल मित्र, जन औषधी जन जागरण अभियान, ‘आओ जन औषधी मित्र बने’ आणि जन औषधी जन आरोग्य मेळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वांना परवडणा-या किंमतीमध्ये औषधे उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभरामध्ये 8,600 पेक्षा जास्त जनऔषधी दुकाने सुरू करण्यात आली आहेत. देशातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे जन औषधी दुकान आहे.