पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2021 चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. ‘आपल्या सामायिक भविष्याची पुनर्व्याख्या : सर्वांसाठी सुरक्षित आणि संरक्षित वातावरण’ ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे. गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे, मालदीवच्या पीपल्स मजलिसचे सभापती मोहम्मद नशीद, संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचिव अमीना जे मोहम्मद आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
शिखर परिषदेबद्दल
जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद या ऊर्जा आणि संसाधने संस्थेच्या (टेरी) महत्वाकांक्षी कार्यक्रमाची 20वी आवृत्ती, 10-12फेब्रुवारी, 2021 दरम्यान ऑनलाइन होणार आहे. या परिषदेत अनेक देशांचे प्रमुख, व्यापारी नेते, शिक्षणतज्ज्ञ, हवामान वैज्ञानिक, युवा आणि नागरी समाज, हवामान बदलाच्या विरूद्ध लढ्यात एकत्रित येत आहेत. भारताचे पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व भू विज्ञान मंत्रालय या शिखर परिषदेचे प्रमुख भागीदार आहेत. ऊर्जा आणि उद्योग संक्रमण, अनुकूलन आणि लवचिकता, निसर्ग आधारित उपाय, हवामान वित्तसहाय्य, सर्क्युलर अर्थव्यवस्था, स्वच्छ महासागर आणि वायू प्रदूषण या सारख्या विषयांवर परिषदेदरम्यान चर्चा होणार आहे.