पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जागतिक भारतीय अन्न 2023’ या खाद्यान्नविषयक महा प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे होणार आहे.
स्वयंसहाय्यता बचत गटांना बळकट करण्याच्या उद्देशाने यावेळी पंतप्रधान बचत गटाच्या एक लाख सदस्यांना बियाणे भांडवल मदत अनुदान वितरित करणार आहेत. या मदत अनुदानामुळे, बचत गटांच्या उत्पादनांना अधिक सुधारित पॅकेजिंग आणि दर्जेदार निर्मिती यांच्या माध्यमातून बाजारपेठेत अधिक चांगली किंमत मिळवण्यात मदत होईल. पंतप्रधान मोदी यावेळी ‘जागतिक भारतीय अन्न 2023’ कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित फूड स्ट्रीटचे देखील उद्घाटन करतील. या फूड स्ट्रीटवर प्रादेशिक पाककृती आणि राजेशाही पाककलावारसा यांचे दर्शन घडेल. या उपक्रमात 200 पेक्षा अधिक शेफ सहभागी होणार असून ते पारंपरिक भारतीय पदार्थ सादर करतील आणि त्यातून हा उपक्रम एक वैशिष्ट्यपूर्ण पाककलाविषयक अनुभव देईल.
भारताला ‘जगाचे फूड बास्केट’ या स्वरुपात सादर करणे तसेच 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’म्हणून साजरे करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमामुळे सरकारी संस्था, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, शेतकरी, आन्त्रप्रोनर्स आणि इतर भागधारकांना चर्चेत सहभागी होऊन भागीदारी संबंध प्रस्थापित करणे तसेच कृषी खाद्यान्न क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेणे यासाठीचा नेटवर्किंग आणि व्यापारविषयक मंच उपलब्ध होणार आहे. यावेळी गुंतवणूक तसेच व्यापार करण्यातील सुलभता या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करणारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद देखील होणार आहे.
भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांतील नवोन्मेष तसेच सामर्थ्य यांचे दर्शन घडवणारी विविध दालने येथे उभारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणारी आणि आर्थिक सक्षमीकरण, गुणवत्तेची हमी आणि यंत्रे तसेच तंत्रज्ञान यांतील नवोन्मेष यांच्यावर अधिक भर देणारी 48 सत्रे होणार आहेत.
जगातील आघाडीच्या अन्न प्रक्रिया उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह 80 हून अधिक देशांतील व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी जगभरातील 80 हून अधिक देशांतून आलेल्या 1200 खरेदीदारांचा सहभाग असलेली रिव्हर्स बायर सेलर मीट ही बैठक देखील होणार आहे. या कार्यक्रमासाठी नेदरलँड्स हा भागीदार देश म्हणून कार्य करेल तर जपान हा कार्यक्रमाचा भर असलेला देश असेल.