पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, उद्या म्हणजेच येत्या 23 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता, वाणिज्य आणि उद्योग भवनाच्या 'वाणिज्य भवन' या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान निर्यात- (NIRYAT म्हणजेच व्यापाराच्या वार्षिक विश्लेषणासाठी राष्ट्रीय आयात-निर्यात नोंदी करणाऱ्या) पोर्टलचाही शुभारंभ करतील. भारताच्या परदेशी व्यापाराशी संबंधित आवश्यक ती सगळी माहिती संबंधित व्यक्तींना एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करतील.
नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ उभरण्यात आलेल्या वाणिज्य भवनाची संरचना एक स्मार्ट इमारत म्हणून करण्यात आली असून, शाश्वत स्थापत्याच्या तत्वावर ते आधारलेले आहे. तसेच यात, ऊर्जा बचतीवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हे एक एकात्मिक आणि अत्याधुनिक कार्यालय संकुल म्हणून विकसित करण्यात आले असून, मंत्रालयाच्या दोन विभागांचे- वाणिज्य विभाग आणि उद्योग तसेच अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग- कामकाज इथून चालेल.