पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 18 मे 2023 रोजी नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे सकाळी साडे दहा वाजता, आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, 47 व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त त्याचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची संकल्पना, “संग्रहालये,शाश्वतता आणि कल्याण’ अशी आहे. या वस्तूसंग्रहालय प्रदर्शनामागचा उद्देश, संग्रहालयांबाबत या क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत सर्वंकष चर्चा सुरु करणे आणि भारताच्या सांस्कृतिक मुत्सद्देगिरी मध्ये महत्वाची भूमिका पार पाडू शकतील, अशा सांस्कृतिक केंद्रांची निर्मिती करणे हा आहे.
याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉकमधील आगामी राष्ट्रीय संग्रहालयाच्या ‘आभासी वॉकथ्रू’चेही उद्घाटन करतील. हे संग्रहालय म्हणजे, भारताचे वर्तमान घडवण्यात योगदान देणाऱ्या भारताच्या भूतकाळातील ऐतिहासिक घटना, व्यक्तिमत्त्वे, कल्पना आणि कामगिरी ठळकपणे प्रदर्शित करण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे.
तसेच,आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे मॅस्कॉट म्हणजेच शुभंकर, ‘अ डे इन म्युझियम’ म्हणजेच ‘एक दिवस संग्रहालयामध्ये’ ही चित्रमय कादंबरी, दिवस, भारतीय संग्रहालयांची निर्देशिका, कर्तव्य पथचा खिशात मावेल असा नकाशा आणि संग्रहालय कार्ड्सचे अनावरण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल.
आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे शुभंकर हे चेन्नापट्टणम कला शैलीतील लाकडापासून बनवलेल्या नर्तिकेची मूर्ती आहे. तर चित्रमय कादंबरीत राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देणाऱ्या मुलांच्या समूहाचे वर्णन आहे, ज्यांना संग्रहालयासंदर्भात उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींबद्दल माहिती मिळते. भारतीय वस्तुसंग्रहालयांची निर्देशिका ही भारतीय संग्रहालयांचे सर्वंकष सर्वेक्षण आहे. तर कर्तव्यपथाचा छोटा नकाशा विविध सांस्कृतिक जागा आणि संस्थांची माहिती देणारा असून, त्याद्वारे, काही महत्वाच्या ऐतिहासिक मार्गांमधील इतिहासाचाही मागोवा घेता येईल. म्युझियम कार्ड्स हा देशभरातील प्रतिष्ठित संग्रहालयांचे सचित्र दर्शन आणि माहिती देणारा, 75 कार्डांचा संच आह. याद्वारे सर्व वयोगटातील लोकांना संग्रहालयांची अभिनव पद्धतीने ओळख करुन दिली आहे. प्रत्येक कार्डमध्ये संग्रहालयांची थोडक्यात माहिती आहे.
या कार्यक्रमामध्ये जगभरातील सांस्कृतिक केंद्रे आणि संग्रहालयांमधील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाचाही सहभाग असेल.