पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 मार्चला सकाळी 11 वाजता, जागतिक भरड धान्य ( श्री अन्न) परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. नवी दिल्लीत, पुसाच्या सुब्रमण्यम हॉल, एनएएससी संकुलात ही परिषद होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शन देखील करतील.
भारताने संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या प्रस्तावानुसार, संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेने, 2023 हे वर्ष, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तसेच, हे वर्ष, लोकचळवळ म्हणून साजरे करावे, ह्या पंतप्रधानांच्या विचारांना अनुसरून, तसेच भारताला भरड धान्याचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी, केंद्र सरकारची सर्व मंत्रालये/विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, शेतकरी आणि स्टार्ट अप कंपन्या, निर्यातदार, किरकोळ व्यावसायिक आणि इतर सर्व भागधारकांना एकत्रित करत, भरड धान्याचे उत्पादक, ग्राहक आणि हवामान अशा सर्वांना असलेल्या लाभांविषयी जनजागृती करणे आणि या धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत. याच सगळ्या संदर्भात, भारतात होणारी जागतिक भरड धान्य परिषद, अतिशय महत्वाचा कार्यक्रम ठरणार आहे.
या दोन दिवसीय जागतिक परिषदेत भरड धान्याशी (श्री अन्न) संबंधित सर्व विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यात, भरड धान्याचा उत्पादक आणि ग्राहकांमध्ये तसेच इतर भागधारकांमध्ये प्रसार, आणि प्रोत्साहन, भरड धान्यांची मूल्यसाखळी विकसित करणे, भरड धान्यांचे आरोग्यदायी आणि पोषक लाभ, इत्यादींचा समावेश आहे. विविध देशातील. कृषी मंत्री, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक, पोषक आहार तज्ञ, आरोग्य तज्ञ, स्टार्ट अप नेते आणि इतर हितसंबंधीय या बैठकीत सहभागी होणार आहेत.