नवी दिल्लीत यशोभूमी येथे 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी 9व्या जी -20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेचे उदघाटन करणार आहेत. भारताच्या जी- 20 अध्यक्षतेच्या व्यापक रुपरेषेअंतर्गत भारताच्या संसदेद्वारे ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या जी -20 अध्यक्षतेच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, 9व्या पी- 20 शिखर परिषदेची संकल्पना "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद" ही आहे.या कार्यक्रमाला जी- 20 सदस्य आणि आमंत्रित देशांच्या संसदेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. 9-10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीत जी 20 प्रमुख नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकन युनियन जी- 20 चा सदस्य झाल्यानंतर संपूर्ण -आफ्रिकन संसद प्रथमच पी -20 शिखर परिषदेत सह्भाग घेणार आहे.
सार्वजनिक डिजिटल मंचाद्वारे लोकांच्या जीवनात परिवर्तन; महिलांच्या नेतृत्वाखालील विकास; शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेला गती देणे आणि शाश्वत ऊर्जा संक्रमण या चार मुख्य विषयांवर पी -20 शिखर परिषदेत प्रामुख्याने भर दिला जाईल.
निसर्गाशी सुसंगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टीने 12 ऑक्टोबर 2023 रोजी लाईफ (LiFE ) (पर्यावरणस्नेही जीवनशैली ) यावर आधारित एक संसदीय मंच देखील परिषदेच्या पूर्वी आयोजित केला जाईल.