पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9:45 वाजता 7 व्या भारतीय मोबाइल परिषद (आयएमसी) 2023 चे नवी दिल्लीच्या प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे उद्घाटन करतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान देशभरातील शैक्षणिक संस्थांना 100 ‘5G यूज केस लॅब’ प्रदान करतील. या प्रयोगशाळा ‘100 5G लॅब उपक्रम’ अंतर्गत विकसित केल्या जात आहेत.
‘100 5G प्रयोगशाळा उपक्रम’ हा भारताच्या अनन्यसाधारण गरजा तसेच जागतिक मागणी या दोहोंची पूर्तता करणार्या 5G ऍप्लिकेशन्सच्या विकासाला प्रोत्साहन देऊन 5G तंत्रज्ञानाशी संबंधित संधींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे. या अनोख्या उपक्रमामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य, ऊर्जा, वाहतूक इत्यादी विविध सामाजिक आर्थिक क्षेत्रांमध्ये नवोन्मेष वाढेल आणि 5G तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये देशाला आघाडीवर नेले जाईल. देशात 6G-सुसज्ज शैक्षणिक आणि स्टार्ट-अप परिसंस्था निर्माण करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हा उपक्रम राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासाच्या दिशेने एक पाऊल आहे.
इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच आहे आणि त्याचे आयोजन 27 ते 29 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत होईल. हा कार्यक्रम दूरसंचार आणि तंत्रज्ञानातील भारताच्या अतुलनीय प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी, महत्वपूर्ण घोषणा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल आणि स्टार्ट-अपना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपाय प्रदर्शित करण्याची संधी प्रदान करेल.
'जागतिक डिजिटल नवोन्मेष' या संकल्पनेसह, प्रमुख अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकासक, निर्माता आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान मजबूत करणे हे आयएमसी 2023 चे ध्येय आहे. ही तीन दिवसीय परिषद 5G, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकेल आणि सेमीकंडक्टर उद्योग, हरित तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा इत्यादींशी संबंधित समस्यांवर चर्चा करेल.
यावर्षी आयएमसी 'अॅस्पायर' नावाचा एक स्टार्टअप कार्यक्रम सादर करत आहे. नवीन उद्योजक उपक्रम आणि सहयोग याला चालना मिळण्याच्या उद्देशाने तो स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि प्रस्थापित व्यवसाय यांच्यातील संबंधांना प्रोत्साहन देईल.
आयएमसी 2023 मध्ये सुमारे 5000 सीईओ स्तरावरील प्रतिनिधी, 230 प्रदर्शक, 400 स्टार्टअप आणि इतर हितधारकांसह सुमारे 22 देशांतील एक लाखाहून अधिक सहभागी उपस्थित राहतील.