पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता बस्ती जिल्ह्यात आयोजित खासदार खेळ महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन होणार आहे. बस्तीचे लोकसभा खासदार हरीश द्विवेदी 2021 पासून बस्ती जिल्ह्यात खासदार खेळ महाकुंभ आयोजित करत आहे.
खासदार खेळ महाकुंभ 2022-23 दोन टप्प्यात आयोजित करण्यात येत आहे. पहिला टप्पा 10 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता तर दुसरा टप्पा 18 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.
कुस्ती, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस इत्यादी खुल्या मैदानातील आणि क्रीडागृहातील अशा दोन्ही प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन खेल महाकुंभ अंतर्गत केले जाते. याशिवाय निबंध लेखन, चित्रकला, रांगोळी काढणे इ.स्पर्धांचे आयोजनही यादरम्यान केले जाते.
बस्ती जिल्हा आणि आसपासच्या भागातील तरुणांना त्यांच्यातील क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी संधी आणि व्यासपीठ प्रदान करणारा, खेळ महाकुंभ हा एक अभिनव उपक्रम आहे. तो इथल्या तरुणांना खेळाकडे करीयर म्हणून पाहण्याची दृष्टीही देतो. तसेच या भागातील तरुणांमध्ये शिस्त, सांघिक कार्य, निकोप स्पर्धा, आत्मविश्वास आणि राष्ट्रवादाची भावना रुजवण्याचा प्रयत्न खेळ महाकुंभाच्या माध्यमातून केला जातो.