पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता आंध्र प्रदेश मधील पुट्टपर्थी येथील साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटन समारंभाला जगभरातील मान्यवर आणि भक्त सहभागी होणार आहेत.
श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्टने पुट्टपर्थी येथील प्रशांती निलायम येथे साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटर ही नवीन सुविधा निर्माण केली आहे. प्रशांती निलायम हा श्री सत्य साई बाबा यांचा प्रमुख आश्रम आहे. सांस्कृतिक,आध्यात्मिक देवाणघेवाण आणि जागतिक सौहार्द्र वाढीला लागावे, या उद्देशाने दानशूर रियुको हिरा यांनी हे कन्व्हेन्शन सेंटर दान केले आहे. याद्वारे वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या लोकांना एकत्र येऊन एकमेकांशी सांस्कृतिक बंध जोडून श्री सत्य साई बाबांची शिकवण आचरणात आणण्यासाठी एक पोषक वातावरण प्राप्त होईल. येथील जागतिक दर्जाच्या सुविधा आणि पायाभूत सेवा सुविधांमुळे परिषदा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील ज्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींमध्ये संवाद आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढीला लागेल. या विस्तीर्ण संकुलात ध्यान कक्ष, प्रसन्न बागा आणि निवासासाठी सुविधा देखील आहेत.