पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे दि. 8 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उद्घाटन करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ते हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पंतप्रधानाच्या दूरदृष्टीनुसार देशाच्या आर्थिक विकासासाठी जलमार्गांचा वापर करण्यासाठी या योजनेचे केलेले काम म्हणजे एक महत्वाचे आणि मोठे पाऊल आहे. याप्रसंगी पंतप्रधान जलमार्ग सेवेच्या स्थानिक वापरकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
जलमार्ग वाहतुकीसाठी हजिरा येथे तयार करण्यात आलेल्या रो-पॅक्स टर्मिनलची लांबी 100 मीटर असून रूंदी 40 मीटर आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. टर्मिनलमध्ये प्रशासकीय कार्यालयाची इमारत, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, विद्युत उपकेंद्र आणि पाण्याची टाकी अशा आवश्यक असलेल्या सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत.
रो-पॅक्स फेरी व्हेसलचे ‘व्होएज सिम्फनी’ या नावाचे तीन डेकचे जहाज आहे. त्याची क्षमता 2500-2700 मेट्रिक टन आहे. त्याचबरोबर 12000 ते 15000 जीटी सामान वाहून नेण्याची क्षमता आहे. या फेरी बोटीच्या मुख्य डेकवरून 30 मालमोटारी (प्रत्येकी 50 मेट्रिक टन वजनाच्या) वाहून नेता येणार आहेत. अप्पर डेकवर 100 प्रवासी गाडया आणि सर्वात वरच्या प्रवासी डेकवर 500 प्रवासी आणि त्याव्यतिरिक्त जहाजावरील 34 कर्मचारी आणि आदरातिथ्य करणारा कर्मचारी वर्ग यांची वाहतूक होऊ शकणार आहे.
हजिरा ते घोघा या दरम्यान जलवाहतुकीचे अनेक लाभ होणार आहेत. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये हा जलमार्ग ‘गेट वे’ म्हणून काम करणार आहे. यामुळे घोघा ते हजिरा यांच्यामधले 370 किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते अवघे 90 किलोमीटर होणार आहे. त्याचबरोबर सामानाच्या वाहतुकीचा वेळ 10 ते 12 तासांवरून फक्त चार तास होणार आहे. याचा परिणाम इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. (अंदाजे प्रतिदिनी 9000 लिटर्स इंधन बचत होऊ शकणार आहे.) त्याचबरोबर वाहनांच्या देखभालीचा खर्च वाचू शकणार आहे. या बोटीच्या प्रति दिवसाला हजिरा ते घोघा अशा तीन फे-या होणार आहेत. त्यामुळे वर्षाला अंदाजे पाच लाख प्रवासी आणि 80,000 प्रवासी गाड्या, 50,000 दुचाकी वाहने आणि 30,000 मालमोटारींची वाहतूक होवू शकणार आहे. या जलमार्गामुळे मालमोटार चालकांना रस्त्यावरून प्रवास करताना होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीचा त्रास कमी होईल. त्यांना गाडी चालवून येणारा थकवा कमी होईल तसेच कमी कालावधीत प्रवास होत असल्यामुळे त्यांना जास्त फे-या करून उत्पन्न वाढविण्याची संधी मिळू शकणार आहे. त्याचबरोबर वाहनांची वाहतूक कमी झाली तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमालीचे कमी होणार आहे. प्रतिदिनी अंदाजे 24 मेट्रिक टन म्हणजेच प्रतिवर्षाला 8,653 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊ शकणार आहे.
या जलमार्गामुळे पर्यटन व्यवसाय भरभराटीला येण्यासही मदत मिळणार आहे आणि त्यामुळे सौराष्ट्र भागामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. फेरी सेवेमुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागामधील बंदरांच्या क्षेत्रात फर्निचर आणि खते उद्योगाला चालना मिळणार आहे. गुजरातमध्ये विशेषतः पोरबंदर, सोमनाथ, व्दारका आणि पालिताना येथे पर्यटनाला प्रोत्साहन मिळू शकणार आहे. फेरी सेवेमुळे संपर्क व्यवस्थेचा विस्तार होत आहे, त्यामुळे गिर येथील वन्यजीव अभयारण्यामध्ये असलेले आशियाई सिंह पाहण्यासाठी प्राणीप्रेमींना येणे सुलभ होणार आहे..