पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित सर्व राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
सहकारी संघराज्य भावना पुढे नेत, बहुआयामी दृष्टीकोनातून प्लास्टिक प्रदूषणाचे उच्चाटन, हवामान बदलाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीवर भर देणाऱ्या राज्य कृती योजना यासारख्या मुद्द्यांवर अधिक प्रभावी धोरणे तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमधला समन्वय वृध्दींगत व्हावा याकरिता ही परिषद आयोजित केली जात आहे. या बैठकीत, निकृष्ट जमीनीचा पोत सुधारणे तसेच वन्यजीव संरक्षणावर विशेष लक्ष देत वनआच्छादन वाढवण्यावरही भर दिला जाईल.
23 आणि 24 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय परिषदेत विविध संकल्पनांवर आधारित सहा सत्रे असतील. या सत्रांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली (LiFE), हवामान बदलाचा सामना (उत्सर्जन कमी करणे आणि हवामानाच्या प्रभावांना अनुकूल करणे याबाबतच्या हवामान बदलावरील राज्य कृती योजना अद्ययावत करणे); परिवेश (एकात्मिक ग्रीन क्लिअरन्ससाठी एक खिडकी योजना); वनीकरण व्यवस्थापन; प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण; वन्यजीव व्यवस्थापन; प्लास्टिक आणि कचरा व्यवस्थापन या विषयांवरही भर दिला जाईल.