पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सकाळी10 वाजता जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करणार आहेत.या प्रसंगी, पंतप्रधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरणही करणार आहेत.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या दोन दिवसांच्या परिषदेत न्यायालयांसाठी पायाभूत सुविधा आणि मानव संसाधने, तसेच सर्वांसाठी सर्वसमावेशक न्यायालये, न्यायिक सुरक्षा आणि न्यायिक कल्याण, खटला व्यवस्थापन आणि न्यायिक प्रशिक्षण,
यासारख्या जिल्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर पाच कामकाज सत्रे आयोजित केली आहेत ज्यात या विषयांवर विचारमंथन आणि चर्चा होईल.
भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भारताचे अटर्नी जनरल, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष हे मान्यवर या उदघाटन कार्यक्रमात सहभागी होतील.