पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन करणार आहेत. सत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्य पथाकडे अर्थात जनतेची मालकी आणि त्यांच्या सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून बदलले जाणार आहे. याप्रसंगी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे. ही पावले ‘वसाहतवादी मानसिकतेचा कोणताही लवलेश मागे ठेवू नका’ या पंतप्रधानाच्या अमृत कालमधील नव भारताच्या दुसऱ्या ‘पंच प्रणा’ शी सुसंगत आहेत.
वर्षानुवर्षे नव्याने बनलेल्या सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या नजिकच्या राजपथ आणि लगतच्या भागात वर्षानुवर्षे अभ्यागतांचा , वाढत्या रहदारीचा ताण होता. त्यामुळे त्याच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत होता. सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, रस्त्यावरील फर्निचर आणि वाहनतळासाठी पुरेशी जागा या मूलभूत सुविधांचा त्यात अभाव होता. अपुरी मार्गदर्शक चिन्हे, पाण्याची अकार्यक्षम व्यवस्था आणि अव्यवस्थित वाहनतळाचाही त्यात समावेश होता. तसेच, लोकांवर कमीतकमी निर्बंध राहतील अशाप्रकारे प्रजासत्ताक दिन संचलन आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम व्यत्ययाशिवाय आयोजित करण्याची गरज भासू लागली. स्थापत्यशास्त्राची अखंडता आणि सातत्य सुनिश्चित करत संबंधित समस्या लक्षात घेऊन पुनर्विकास करण्यात आला आहे.
सुशोभित केलेले भूभाग, हिरवळीतून जाणारे पदपथ,मधोमध असलेली हिरवीगार झाडी, नूतनीकरण केलेले पाणवठे, नवीन सुविधा असणारी निवासस्थाने, चिन्हांकित माहिती देणारे रस्ते आणि अधूनमधून विविध वस्तूंची विक्री करणारे स्टॉल्स या कर्तव्य पथावर असतील.याव्यतिरिक्त नवीन पादचारी भुयारे, पार्किंगसाठी सुधारित सोयिस्कर जागा, प्रदर्शनासाठी सज्ज अशा जागा, आणि रात्रीच्या वेळी प्रकाश देणारी व्यवस्था ही तेथे असेल जेणेकरून त्या सार्वजनिक जागेचा सर्वांना आनंद घेता येईल.याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची सुविधा, जलसंवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाश व्यवस्था यासारखी अनेक शाश्वत विकास दर्शविणारी वैशिष्ट्ये देखील यात समाविष्ट आहेत. गतवर्षाच्या सुरुवातीला 'पराक्रम दिन (23 जानेवारी)' यादिवशी जेथे नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याची स्थापना केली होती, तिथेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे, पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण केले जाईल. ग्रॅनाइटने बनवलेला हा पुतळा नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाला अर्पण केलेली सुयोग्य श्रद्धांजली आहे आणि देशाने त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या ऋणानुबंधाचे प्रतीक आहे.प्रमुख शिल्पकार श्री अरुण योगीराज यांनी तयार केलेला, 28 फूट उंचीचा हा पुतळा मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडातून कोरला गेला असून त्याचे वजन 65 मेट्रिक टन आहे.