

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (डब्ल्यूटीएसए) 2024 चे उद्घाटन करतील.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान यावर्षीच्या 8 व्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चेही उद्घाटन करतील.
डब्ल्यूटीएसए ही डिजिटल तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ संस्थेच्या मानकीकरण कार्यासाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी प्रशासकीय परिषद आहे. भारत आणि हिंद-प्रशांत क्षेत्र प्रथमच आयटीयू-डब्ल्यूटीएसए चे यजमानपद भूषवणार आहे.हा एक महत्त्वाचा जागतिक कार्यक्रम आहे जो 190 हून अधिक देशांतील दूरसंचार, डिजिटल आणि आयसीटी क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 3,000 हून अधिक उद्योग धुरीण, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञांना एकत्र आणेल.
डब्ल्यूटीएसए 2024 ही देशांना 6जी, कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, बिग डेटा, सायबर सुरक्षा इ. सारख्या अत्याधुनिक महत्त्वाच्या तंत्रज्ञान मानकांबद्दल चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. भारतात या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने जागतिक दूरसंचार कार्यसुची तयार करण्यात आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा मार्ग निश्चित करण्यात देशाला महत्त्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळणार आहे. भारतीय स्टार्टअप्स आणि संशोधन संस्था बौद्धिक संपदा हक्क आणि मानक आवश्यक पेटंट विकसित करण्यात महत्वपूर्ण दृष्टिकोन साकारण्यासाठी सज्ज आहेत.
इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 भारतातील नवोन्मेष परिसंस्थेचे प्रदर्शन करेल, जिथे आघाडीच्या दूरसंचार कंपन्या आणि नवोदित कंपन्या 6जी, 5जी वापरविषयक प्रदर्शन, क्लाउड आणि एज कॉम्प्युटिंग, आयओटी, सेमीकंडक्टर, सायबर सुरक्षा, हरित तंत्रज्ञान सुरक्षा, satcom आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन यासह क्वांटम तंत्रज्ञान आणि चक्राकार अर्थव्यवस्थेतील प्रगतीवर प्रकाश टाकतील.
आशियातील सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच इंडिया मोबाइल काँग्रेस म्हणजे उद्योग, सरकार, शैक्षणिक, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान आणि दूरसंचार परिसंस्थेतील अन्य प्रमुख हितधारकांसाठी नाविन्यपूर्ण उपाय, सेवा आणि अत्याधुनिक यूज केस प्रदर्शित करण्यासाठी जगभरात एक प्रसिद्ध मंच ठरला आहे. इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 मध्ये 400 हून अधिक प्रदर्शक, सुमारे 900 स्टार्टअप्स आणि 120 हून अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होतील. 900 पेक्षा जास्त तंत्रज्ञान युज केसचे प्रदर्शन करणे, 100 हून अधिक सत्रांचे आयोजन करणे आणि 600 हून अधिक जागतिक आणि भारतीय वक्त्यांसह विचारमंथन करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.