

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या भारतातील क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान, भारत 6G पथदर्शी दस्तावेज आणि 6G संशोधन आणि विकास टेस्ट बेड ह्या सुविधेचे अनावरण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कॉल बिफोर यू डिग’ ॲप चे अनावरण देखील होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
आय टी यू ही संयुक्त राष्ट्रांची माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (ICTs) क्षेत्रातील विशेष संस्था आहे. जिनेव्हा येथे मुख्यालय असलेल्या, आय टी यू चे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील कार्यालये, प्रादेशिक कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालये यांचे जाळे आहे. भारताने मार्च 2022 मध्ये आय टी यू सोबत क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यासाठी यजमान राष्ट्र म्हणून करार केला आहे. भारतातील क्षेत्रीय कार्यालयात एक नवोन्मेष केंद्र देखील स्थापन केले जाणार आहे ज्यामुळे हे कार्यालय आय टी यू च्या इतर क्षेत्रीय कार्यालयांपेक्षा वेगळे ठरेल.
या क्षेत्रीय कार्यालयाच्या उभारणीसाठी निधी पुरवठा संपूर्णपणे भारताने केला असून, ते नवी दिल्लीत मेहरौली येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. हे कार्यालय भारतासह नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि इराण यांना सेवा देणार असून त्यामुळे राष्ट्रांमधील समन्वय वाढीला लागेल आणि या प्रदेशात परस्परांना लाभदायक असे आर्थिक सहकार्य वृद्धिंगत होईल.
6 जी (टीआयजी-6जी) वर आधारित भारत 6जी पथदर्शी दस्तऐवज आणि तंत्रज्ञान नवोन्मेषी गटाने तयार केला आहे. भारतात 6जी साठी कृती आणि पथदर्शी आराखडा विकसित करण्याकरता नोव्हेंबर 2021 मध्ये विविध मंत्रालये/विभाग, संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था, मानकीकरण संस्था, दूरसंचार सेवा प्रदाते आणि उद्योग यांच्या सदस्यांसह याची स्थापना करण्यात आली होती. शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्ट-अप, एमएसएमई, उद्योग इत्यादींना विकसित होत असलेल्या आयसीटी तंत्रज्ञानाची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी 6 जी टेस्टबेड ही सुविधा प्रदान करेल. भारत 6जी पथदर्शी दस्तऐवज आणि 6 जी टेस्ट बेड, देशात नवोन्मेष, क्षमता निर्माण आणि वेगवान तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सक्षम वातावरण प्रदान करेल.
पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत पायाभूत सुविधा संपर्क व्यवस्था प्रकल्पांचे एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणी यासाठी पंतप्रधानांच्या ध्येयदृष्टीचे उदाहरण त्यांनी दिले. यानुसार कॉल बिफोर यू डिग (CBuD) ॲप हे ऑप्टिकल फायबर केबल्स सारख्या भूमिगत मालमत्तेचे बेदरकार खोदकामामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठीचे साधन आहे. अशा अनिर्बंध खोदकामामुळे देशाचे दरवर्षी सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान होते. CBuD हे मोबाइल ॲप उत्खनन करणारे आणि मालमत्ता मालकांना एसएमएस/ईमेल सूचना आणि क्लिक टू कॉलद्वारे संपर्क करेल, जेणेकरून भूमिगत मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित होऊन देशात नियोजित उत्खनन होईल.
देशाच्या प्रशासनामध्ये ‘संपूर्ण-सरकारी दृष्टिकोन’ अवलंबण्याचा आदर्श घालून देणाऱ्या CBuD मुळे, व्यवसाय करणे सुलभ होऊन सर्व संबंधितांना फायदा होईल. यामुळे संभाव्य व्यावसायिक नुकसान वाचेल आणि रस्ते, दूरसंचार, पाणी, गॅस, वीज यासारख्या अत्यावश्यक सेवांमधील अडथळे कमी होतील. परिणामी, नागरिकांचा त्रासही कमी होईल.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या (आयटीयू) विविध क्षेत्रीय कार्यालयांचे माहिती तंत्रज्ञान/दूरसंचार मंत्री, आयटीयूचे सरचिटणीस आणि इतर वरिष्ठ अधिकारी, संयुक्त राष्ट्र/भारतातील इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख, राजदूत, उद्योगांचे प्रमुख, स्टार्ट-अप, एमएसएमई, शैक्षणिक संस्थाचे प्रमुख, विद्यार्थी आणि इतर घटकांचा सहभाग असेल.