नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे आयोजित भारत ड्रोन महोत्सव 2022 या भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सावाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
यावेळी पंतप्रधान किसान ड्रोन वैमानिकांशी संवाद साधतील, ओपन एअर ड्रोन प्रात्यक्षिकांचे साक्षीदार होतील आणि ड्रोन प्रदर्शन केंद्रातील स्टार्टअप्सशी संवाद साधतील.
भारत ड्रोन महोत्सव 2022 हा दोन दिवसांचा कार्यक्रम असून तो 27 आणि 28 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सरकारी अधिकारी, विदेशी राजनैतिक अधिकारी , सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सार्वजनिक उपक्रम, खाजगी कंपन्या आणि ड्रोन स्टार्टअप इत्यादी यांच्यासह 1600 हून अधिक प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.प्रदर्शनात 70 हून अधिक प्रदर्शक ड्रोनच्या वापराची विविध प्रात्यक्षिके प्रदर्शित करतील. या महोत्सवात ड्रोन वैमानिक प्रमाणपत्रे वितरणाचा आभासी समारंभ , उत्पादनांची सुरुवात , गट चर्चासत्र , हवाई प्रात्यक्षिके, मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सी प्रोटोटाइपचे प्रदर्शन, यासह इतर गोष्टींचा यात समावेश आहे.