पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज 25 नोव्हेंबर रोजी,दुपारी 3 वाजता,भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या जागतिक सहकारी परीषद-2024(ICA, ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स) याचे उद्घाटन करतील तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे पुढील वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 असल्याचे जाहीर करत, त्यांचा आरंभ करतील.
जागतिक सहकारी चळवळीची प्रमुख संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या (ICA) 130 वर्षांच्या इतिहासात आयसीए (ICA) जागतिक सहकारी परीषद (ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स) आणि आयसीएची आमसभा ही प्रथमच भारतात आयोजित करत आहे. भारतीय सहकारी संस्था,अमूल (AMUL)आणि भारतीय शेतकरी खते उद्योग सहकारी संस्था(इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड ,IFFCO) भारतीय शेतकरी सहकारी संस्था KRIBHCO) यांच्या संयुक्त विद्यमाने, आंतरराष्ट्रीय सहकार महासंघ आणि भारत सरकार ही जागतिक परिषद 25 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करत आहेत.
"सहकारातून सर्वांसाठी समृद्धी" ही या परिषदेची संकल्पना असून भारत सरकारच्या "सहकार से समृद्धी" (सहकारातून समृद्धी) या संकल्पनेशी ती सुसंगत आहे. विशेष करुन दारिद्र्य निर्मूलन, लैंगिक समानता आणि शाश्वत आर्थिक वाढ यासारख्या क्षेत्रांत संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी जगभरातील सहकारी संस्थांना येणारी आव्हाने आणि संधी;या विषयांवर विविध चर्चासत्रे, गटचर्चा सत्रे आणि कार्यशाळा यावेळी होणार आहेत.
“सहकाराने एक चांगले जग बनवता येते” या संकल्पनेवर आधारित सामाजिक समावेश, आर्थिक सबलीकरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका बदलणारी भूमिका अधोरेखित करत पंतप्रधान यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विद्यमाने पुढील वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह 2025) म्हणून जाहीर करतील.संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांनुसार (SDGs सहकारी संस्थांना शाश्वत विकासाचे निर्णायक गतीचालक म्हणून ओळखले जाते.यात विशेष करून असमानता कमी करणे, चांगल्या कामांना चालना देणे आणि गरिबी दूर करणे, अशा कामांचा समावेश आहे. 2025 हे वर्ष जगातील सर्वात गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकारी उपक्रमांची शक्ती प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने नियोजित केलेला एक जागतिक उपक्रम असेल.
सहकार चळवळीतील भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून यावेळी एका टपाल तिकीटाचे प्रकाशन पंतप्रधान करतील. शांतता, सामर्थ्य, लवचिकता आणि विकास यांचे प्रतीक असलेल्या कमळाचे चित्र या टपाल तिकीटावर आहे जे शाश्वत आणि समुदाय विकासाची सहकारी मूल्ये प्रतिबिंबित करते. कमळाच्या पाच पाकळ्या निसर्गाच्या पाच घटकांचे (पंचतत्व) प्रतिनिधित्व करतात, तसेच पर्यावरण, सामाजिक आणि आर्थिक शाश्वतता यासाठी सहकारी संस्थांच्या बांधिलकीवर प्रकाश टाकतात.कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे प्रतीक असलेल्या ड्रोनसह कृषीव्यवसाय, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, ग्राहक सहकारी संस्था आणि गृहनिर्माण यांसारख्या क्षेत्रांचाही या रचनेत समावेश करण्यात आला आहे.
भूतानचे माननीय पंतप्रधान महामहिम दाशो त्शेरिंग तोबगे आणि फिजीचे माननीय उपपंतप्रधान महामहिम मानोआ कामिकामिका यांच्यासह 100 हून अधिक देशांतील सुमारे 3,000 प्रतिनिधी या परीषदेला उपस्थित राहतील