पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे दुपारी 12 वाजता केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील.
कार्यक्रमादरम्यान, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि सीबीआयच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी सुवर्ण पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी समारंभ होणार असून त्यात पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांना पदके प्रदान करतील. शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे सीबीआयच्या नव्याने बांधलेल्या कार्यालयीन संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. सीबीआयच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून टपाल तिकीट आणि स्मृती नाण्याचे अनावरण पंतप्रधान करतील. ते सीबीआयच्या ट्विटर हँडलचाही प्रारंभ करणार आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या दिनांक 1 एप्रिल 1963 च्या ठरावाद्वारे केंद्रीय अन्वेषण ब्यूरोची स्थापना करण्यात आली.