पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद दिनानिमित्त,
23 मार्च रोजी कोलकातामध्ये व्हिक्टोरिया स्मारक सभागृहात, संध्याकाळी 6 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बिप्लोबी भारत कलादालनाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान आणि ब्रिटीश वसाहतींच्या राजवटी विरोधात त्यांनी केलेला सशस्त्र प्रतिकार या कलादालनात दाखवण्यात आला आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या या पैलूला मुख्य प्रवाहात अनेकदा योग्य स्थान दिले गेले नाही. या नवीन कलादालनाचा उद्देश 1947 पर्यंत घडलेल्या घटनांचा समग्र पट मांडणे आणि क्रांतिकारकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकणे हा आहे.
क्रांतिकारी चळवळीला चालना देणारी राजकीय आणि बौद्धिक पार्श्वभूमी बिप्लोबी भारत कलादालनात चित्रित केली आहे. यात क्रांतिकारक चळवळीचा जन्म, क्रांतिकारक नेत्यांच्या महत्त्वपूर्ण संघटनांची निर्मिती, चळवळीचा प्रसार, भारतीय राष्ट्रीय सैन्याची निर्मिती, नौदल बंडाचे योगदान, यासह इतर गोष्टी दाखवल्या आहेत.