पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता नवी दिल्लीत भारत मंडपम येथे देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024 चे उद्घाटन करतील.
भारत टेक्स 2024 चे आयोजन 26 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान केले जात आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या 5F दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन सूत, विणलेले कापड आणि फॅ शन यांच्याद्वारे संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळीसह शेतातून परदेशात संकल्पना दिसणार आहे. हे वस्त्रोद्योग क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य दृगोच्चर करेल आणि जागतिक वस्त्रोद्योग सत्ताकेंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत असल्याचे पुन्हा सिद्ध करेल.
11 वस्त्रोद्योग निर्यात चालना परिषदांच्या संघाद्वारे आयोजित आणि सरकारकडून पाठबळ मिळालेला आणि शाश्वततेवर अधिक लक्ष केंद्रित केलेला भारत टेक्स 2024 व्यापार आणि गुंतवणुक अशा दुहेरी आधारस्तंभांवर उभा केला गेला आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमात 65 हून अधिक ज्ञान सत्रे असतील ज्यात 100 हून अधिक जागतिक तज्ञ या क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करतील. यामध्ये टिकाऊपणा आणि चक्राकारता यासाठी समर्पित दालन, ‘इंडी हाट’, भारतीय वस्त्र वारसा, टिकाऊपणा आणि जागतिक रचना, तसेच परस्परपूरक कापड चाचणी विभाग आणि उत्पादन प्रात्यक्षिके यासारख्या विविध संकल्पनांवर आधारित फॅशन सादरीकरणे असतील.
भारत टेक्स 2024 मध्ये धोरण निर्माते, जागतिक दर्जाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 3,500 हून अधिक प्रदर्शक, 100 हून जास्त देशांतील अनेक ग्राहक आणि 40,000 हून अधिक व्यावसायिक अभ्यागत, वस्त्रोद्योग विद्यार्थी, विणकर, कारागीर आणि कापड कामगार यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. या कार्यक्रमादरम्यान 50 हून अधिक घोषणा आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा असल्याने, वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आणि व्यापाराला आणखी चालना मिळेल आणि निर्यात वाढायला मदत होईल. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत हा पंतप्रधानांचा दृष्टीकोन पुढे नेण्यासाठी हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.