भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी केली जाईल असे भारत सरकारने घोषित केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:45 वाजता रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यानासह स्वातंत्र्यसैनिक संगहालयाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करतील.
आदिवासी समुदायांचे अमूल्य योगदान विशेषत: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले बलिदान पंतप्रधानांनी नेहमीच अधोरेखित केले आहे. पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2016 रोजी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी बजावलेल्या भूमिकेवर जोर देऊन, येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती मिळावी या दृष्टीने, शूर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ देशाच्या विविध भागात कायमस्वरूपी समर्पित संग्रहालये बांधण्याची संकल्पना मांडली होती. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आत्तापर्यंत दहा आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या संग्रहालयाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. ही संग्रहालये विविध राज्ये आणि प्रदेशांतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जतन करतील.
जिथे भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तिथे रांची येथील जुन्या मध्यवर्ती कारागृहात भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यानासह स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय हे झारखंड राज्य सरकारच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. देशासाठी आणि आदिवासी समाजासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाला आदरांजली म्हणून हे संग्रहालय कार्य करेल. आदिवासी संस्कृती आणि इतिहासाचे जतन आणि संवर्धन करण्यात हे संग्रहालय महत्त्वाची भूमिका बजावेल. आदिवासींनी त्यांची वने, जमिनीचे हक्क, त्यांची संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष आणि राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी दाखवलेले शौर्य आणि बलिदान या संग्रहालयाच्या माध्यमातून प्रदर्शित केले जाईल.
भगवान बिरसा मुंडा यांच्यासोबतच , या संग्रहालयाच्या माध्यमातून शहीद बुधू भगत, सिद्धू-कान्हू, निलांबर-पितांबर, दिवा-किसून, तेलंगा खाडिया, गया मुंडा, जत्रा भगत, पोटो एच, भगीरथ मांझी, गंगा नारायण सिंग यांसारख्या विविध चळवळींशी संबंधित इतर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदानही अधोरेखित केले जाणार आहे. या संग्रहालयात भगवान बिरसा मुंडा यांचा 25 फुट उंचीचा पुतळा आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांचे नऊ फुट उंचीचे पुतळे असतील.
शेजारील 25 एकर जागेत स्मृती उद्यान विकसित करण्यात आले असून त्यात संगीत कारंजे, अन्न गृह परिसर, बालोद्यान, इन्फिनिटी पूल, उद्यान आणि मनोरंजनाच्या इतर सुविधा असतील.
या कार्यक्रमाला केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.