ईशान्य भारतातील सांस्कृतिक चैतन्य प्रदर्शित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे दुपारी 3 वाजता अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.
प्रथमच साजरा होत असलेला हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव 6 ते 8 डिसेंबर दरम्यान होणार आहे. हा महोत्सव ईशान्य भारतातील विशाल सांस्कृतिक चित्र अधोरेखित करत पारंपरिक कला, हस्तकला आणि सांस्कृतिक प्रथांना एकत्र आणेल.
पारंपरिक हस्तकला, हातमाग, कृषी उत्पादने आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात आर्थिक संधींना चालना देण्यासाठी, महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवात कारागीर प्रदर्शने, ग्रामीण हाट, राज्यनिहाय-दालने आणि ईशान्य क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर तांत्रिक सत्रे असणार आहेत. प्रमुख कार्यक्रमांमध्ये गुंतवणूकदारांची गोलमेज परिषद आणि खरेदीदार-विक्रेता भेटींचा समावेश असेल, ज्याची रचना नेटवर्क, भागीदारी आणि क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या संयुक्त उपक्रमांची उभारणी आणि ते अधिक मजबूत करण्याची अनोखी संधी म्हणून केली जाईल.
या महोत्सवात राष्ट्रीय स्तरावर ईशान्य भारतातील समृद्ध हातमाग आणि हस्तकला परंपरा प्रदर्शित करणारे डिझाईन कॉन्क्लेव्ह आणि फॅशन शो असणार आहेत. या प्रदेशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित करताना, या महोत्सवात उत्साहपूर्ण सांगीतिक कार्यक्रम तसेच ईशान्य भारताच्या स्वदेशी पाककृती देखील दाखवल्या जातील.