पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 9 नोव्हेंबरला सकाळी साडे दहा वाजता वाराणसी येथे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन आणि कोनशिला समारंभ होणार आहे.
या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एकूण 614 कोटी रुपये खर्च आला आहे. यावेळी पंतप्रधान या प्रकल्पांच्या काही लाभार्थ्यांशीही चर्चा करतील. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची या समारंभाला उपस्थिती असणार आहे.
या प्रकल्पांमध्ये सारनाथ येथील लाईट अँड साऊंड शो, रामनगर येथील लाल बहादूर शास्त्री रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, गायींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा, बहुपयोगी बियाणे साठवणूक केंद्र, 100 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेले कृषीमाल गोदाम, आयपीडीएस टप्पा दुसरा, संपूर्णानंद स्टेडीयममधील खेळाडूंसाठीचे गृहसंकुल/वसतिगृह, वाराणसी शहर स्मार्ट दिवे व्यवस्था, 105 अंगणवाडी केंद्र आणि 102 गौ आश्रय केंद्र या सर्व प्रकल्पांचा समावेश आहे.
याच कार्यक्रमात, पंतप्रधान काही प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. यात, दशाश्वमेघ घाट आणि खिडकीया घाटाचा पुनर्विकास, पीएसी पोलीस दलासाठी बरॅक्सची उभारणी, काशी येथील काही रहिवासी वस्त्यांचा पुनर्विकास, बेनिया बाग येथील उद्यानाचा पुनर्विकास आणि वाहनतळ सुविधा, गिरीजा देवी सांस्कृतिक संकुल येथील बहुपयोगी सभागृहाचे अद्ययावतीकरण आणि शहरातील रस्त्यांची दुरुस्तीकामे तसेच पर्यटन स्थळांची विकासकामे, इत्यादींचा समावेश आहे.