पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 जानेवारी रोजी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमाराला दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्याचबरोबर उद्या सकाळी 11 वाजता ते साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे गाडीतून प्रवास देखील करणार आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहिबाबाद ते न्यू अशोक नगर दरम्यान दिल्ली-गाझियाबाद - मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या 13 किलोमीटर लांबीच्या विस्तारीत मार्गाचेही उद्घाटन करतील. यासाठी सुमारे 4,600 कोटी रुपयांचा खर्च केला गेला आहे. प्रादेशिक पातळीवरील दळणवळण जोडण्याच्या दिशेने हा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे. या मार्गाचे उद्घाटन झाल्याने दिल्लीला पहिली नमो भारत जोडणी मिळणार आहे. यामुळे दिल्ली ते मेरठ दरम्यानचा प्रवास लक्षणीयरित्या सुलभ होईल, आणि याचा लाखो लोकांना लाभ मिळेल. या प्रकल्पामुळे लोकांना अद्वितीय सुरक्षा आणि विश्वासार्हतेसह वेगवान आणि आरामदायक प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत रिठाला - कुंडली या विभागाअंतर्गच्या कामाचेही भूमिपूजन करतील. हा मार्ग 26.5 किलोमीटर लांबीचा असेल, या कामासाठी सुमारे 6,230 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कॉरिडॉरमुळे दिल्ली मधील रिठाला हरियाणातील नथुपूर (कुंडली) या भागाशी जोडले जाईल. या विस्तारीत मार्गामुळे दिल्लीच्या वायव्य भागातील तसेच हरयाणातील दळणवळीण जोडणीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. रोहिणी, बवाना, नरेला आणि कुंडली या प्रमुख भागांना या मार्गाचा लाभ होईल. त्यामुळे या भागांमधल्या निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये ये जा करणे अधिक सुलभ होऊ शकणार आहे. हा मार्ग प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर विस्तारित रेड लाइनच्या उपयोगाने दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही करणार आहेत. यासाठी सुमारे 185 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या नव्या इमारतीच्या प्रांगणात अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नवीन इमारतीमध्ये स्वतंत्र जागेत प्रशासकीय विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आंतररूग्ण विभाग आणि एक समर्पित उपचार विभाग उभारला जाणार आहे. या सेवा-सुविधांमुळे रुग्ण तसेच संशोधकांना खात्रीशीरपणे एकात्मिक आणि अविरत आरोग्य सेवा अनुभव मिळू शकणार आहे.