पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलै 2021 ला गुजरातमध्ये रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे करणार आहेत.यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या ॲक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
रेल्वे प्रकल्पांमध्ये ,पुनर्विकास करण्यात आलेले गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानक,गेज रुपांतरीत आणि विद्युतीकरण करण्यात आलेला मेहसाणा- वरेथा मार्ग आणि नव्याने विद्युतीकरण करण्यात आलेल्या सुरेन्द्रनगर-पिपावाव विभागाचा समावेश आहे.
गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेथा दरम्यानच्या मेमू सेवा गाडीला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.
गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास
गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकामध्ये , सुमारे 71 कोटी रुपये खर्चून सुधारणा करण्यात आल्या आहेत. आधुनिक विमानतळाप्रमाणे या स्थानकामध्ये जागतिक तोडीच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. हे स्थानक दिव्यांग स्नेही राहावे यासाठी विशेष तिकीट आरक्षण खिडकी, रॅम्प, उद्वाहने, समर्पित पार्किंग जागा यासह इतर बाबतीत विशेष काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीत हरित इमारत वैशिष्ट्ये पुरवण्यात आली असून त्या दृष्टीने इमारतीची आखणी आहे. बाह्यभागात 32 संकल्पनासह दररोज संकल्पनेवर आधारित प्रकाश व्यवस्था राहील. स्थानकात पंच तारांकित हॉटेलही राहणार आहे.
मेहसाणा- वरेथा गेज रुपांतरीत आणि विद्युतीकरण करण्यात आलेला ब्रॉड गेज मार्ग ( वडनगर स्थानकासह )
293 कोटी रुपये खर्चून 55 किमीच्या मेहसाणा- वरेथा गेज रुपांतरण काम आणि त्याबरोबरच , 74 कोटी रुपये खर्चून विद्युतीकरणाचे काम करण्यात आले आहे. यामध्ये वीसनगर, वडनगर,खेरालु आणि वरेथा या चार नव्या स्थानकासह दहा स्थानके आहेत. यामध्ये वडनगर हे महत्वाचे स्थानक असून वडनगर- मोढेरा- पाटण सांस्कृतिक मंडलाअंतर्गत याचा विकास करण्यात आला आहे. वडनगर स्थानक इमारत दगडी कोरीव कामाचा उपयोग करत कलात्मक करण्यात आली आहे. वडनगर आता ब्रॉड गेज द्वारे जोडण्यात येणार असून या विभागात प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक विना अडथळा सुरु राहू शकणार आहे.
सुरेन्द्रनगर-पिपावाव विभागाचे विद्युतीकरण
या प्रकल्पासाठी 289 कोटी रुपये खर्च आला आहे. पालनपुर, अहमदाबाद आणि देशातल्या इतर भागातून पीपावाव बंदरापर्यंत कर्षण बदलाशिवाय अविरत माल वाहतूक या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. लोको बदलण्यासाठी थांबणे टळल्यामुळे अहमदाबाद, सुरेन्द्रनगर यार्डमध्ये कोंडी कमी होणार आहे.
ॲक्वेटिक्स गॅलरी
ॲक्वेटिक्स गॅलरीमध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागातल्या जल प्रजाती साठी समर्पित टाक्या राहणार असून मुख्य टाकीमध्ये जगातले महत्वाचे शार्क मासे राहणार आहेत. अद्भुत अनुभव देणारा 28 मीटरचा बोगदाही इथे आहे.
रोबोटिक्स गॅलरी
रोबोटिक्स गॅलरी ही रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणारी गॅलरी असून रोबोटिक्स या अद्ययावत क्षेत्राचे दर्शन प्रेक्षकांना घडवणार आहे. प्रवेश द्वाराजवळच ट्रान्सफॉर्मर रोबोची भव्य प्रतिकृती पाहता येणार आहे. या गॅलरीचे वैशिष्ट्य म्हणजे आनंद ,आश्चर्य आणि उत्साह यासारख्या भावना दर्शवू शकणारा मानवासारखा रोबो. औषध, कृषी, अंतराळ, संरक्षण क्षेत्रासह आणि दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारे रोबो वेगवेगळ्या मजल्यावर ठेवण्यात आले आहेत.
नेचर पार्क
या पार्क मध्ये मिस्ट गार्डन, चेस गार्डन, सेल्फी पॉइंट, यासारखी अनेक वैशिष्ट्ये सामावली आहेत. मुलांसाठी अनोखा भूल भुलैय्या तसेच मॅमोथ, टेरर बर्ड यासारख्या नामशेष झालेल्या प्रजातींची वैज्ञानिक माहितीसह शिल्पेही आहेत.