पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात दुपारी 4:30 वाजता राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण मंच (NPDRR) च्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन करतील. यातील तिसऱ्या सत्राची मुख्य संकल्पना "बदलत्या हवामानात स्थानिक पातळीवर जुळवून घेण्याची क्षमता निर्माण करणे" आहे.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. 2023 च्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (OSDMA) आणि लुंगलेई अग्निशमन केंद्र, मिझोरम यांचा समावेश आहे. आपत्ती जोखीम कमी करण्याच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रम, विविध साधने आणि नवीन तंत्रज्ञान दर्शविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण मंच हे आपत्ती जोखीम कमी करण्याच्या क्षेत्रात संवाद साधणे, अनुभव सांगणे, विचार, कल्पना, कृती-केंद्रीत संशोधन आणि संधी शोधण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेले एक बहु-भागधारक व्यासपीठ आहे.