कर्नाटकमधील हुबळी येथे 12 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त, त्यांचे आदर्श, शिकवण आणि योगदानाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो.
देशातल्या युवा प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळवून देण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रवृत्त करण्यासाठी दर वर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो. हा महोत्सव देशाच्या सर्व भागातल्या विविध संस्कृतींना एकाच व्यासपीठावर एकत्र आणतो आणि त्यांना एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेने एकमेकांशी जोडतो. यंदाच्या वर्षी 12 ते 16 जानेवारी दरम्यान, कर्नाटकमध्ये हुबळी-धारवाड येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, “विकसित युवा-विकसित भारत” ही या महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवात युवा परिषद आयोजित करण्यात आली असून, यामध्ये कामाचे भविष्य, उद्योग, नवोन्मेष आणि 21 व्या शतकातील कौशल्ये; हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे; शांतता आणि सलोखा; लोकशाही आणि शासनामध्ये सामायिक भविष्यातील तरुण; आणि आरोग्य आणि कल्याण, या जी20 आणि वाय20 मधील विषयांशी संबंधित, पाच संकल्पनांवर आधारित पाच विषयांवर चर्चा होईल. या परिषदेत साठ पेक्षा जास्त नामवंत तज्ज्ञांचा सहभाग असेल. यावेळी अनेक स्पर्धात्मक आणि बिगर- स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले जातील. स्थानिक पारंपरिक संस्कृतींना चालना देण्यासाठी, स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये लोकनृत्य आणि लोक गीतांचा समावेश असेल. बिगर-स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये योगाथॉनचा समावेश असेल, ज्याचे उद्दिष्ट सुमारे 10 लाख लोकांना योगासने करण्यासाठी एकत्रित आणणे हे आहे. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्तरावरचे कलाकार आठ स्वदेशी खेळ आणि मार्शल आर्ट्चे सादरीकरण करतील.
इतर आकर्षणांमध्ये, खाद्य महोत्सव, युवा कलाकार शिबीर, साहसी क्रीडा उपक्रम, भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाचा परिचय करून देणारी, ‘नो युवर आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स’ ही विशेष शिबिरे इत्यादींचा समावेश आहे.