यूएसआयएसपीएफ’च्या तिस-या वार्षिक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या, दि. 3 सप्टेंबर 2020 रोजी विशेष बीज भाषण होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत असलेल्या या शिखर परिषदेमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.00 वाजता पंतप्रधान मोदी यांचे भाषण होणार आहे.
‘यूएसआयएसपीएफ’ म्हणजेच यूएस-इंडिया स्ट्रेटजिक पार्टनरशिप फोरम ही ना- नफा तत्वावर कार्यरत असलेली संस्था असून भारत आणि अमेरिका यांच्यामधील भागीदारीसाठी काम करते.
या संस्थेच्यावतीने ‘‘ यूएस-इंडिया नेव्हिगेटिंग न्यू चॅलेंजस’’ या संकल्पनेवर दि. 31 ऑगस्ट 2020 पासून पाच दिवसांच्या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतामध्ये जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची असलेली क्षमता, भारतामधील गॅस मार्केटला असलेल्या संधी, परकीय थेट गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी भारतामध्ये सुरू झालेले ईज ऑफ डुइंग बिजनेस, अंतराळ तंत्रज्ञानामध्ये असलेल्या संधी आणि आव्हाने, इंडो- पॅसिफिक आर्थिक मुद्दे, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये आणलेल्या नवसंकल्पना आणि इतर विषयांवर या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत चर्चा करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही या आभासी परिषदेमध्ये सहभागी होत आहेत.