पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. उद्घाटन करण्यात आलेली गाडी जयपूर ते दिल्ली कॅन्टोनमेंट रेल्वे स्थानकांदरम्यान धावेल. या वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा 13 एप्रिल 2023 पासून सुरू होणार असून या गाडीला जयपूर, अलवर आणि गुडगाव येथे थांबे असतील.
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाडी दिल्ली कॅन्टोनमेंट ते अजमेर हे अंतर 5 तास 15 मिनिटांमध्ये गाठेल. याच मार्गावरची सध्याची सर्वात वेगवान गाडी, शताब्दी एक्स्प्रेस, हे अंतर गाठायला 6 तास 15 मिनिटे घेते. अशा प्रकारे, त्याच मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाडीच्या तुलनेत नवीन वंदे भारत एक्सप्रेस 60 मिनिटे अधिक वेगवान असेल.
अजमेर-दिल्ली कॅन्टोनमेंट वंदे भारत एक्सप्रेस ही हाय राइज ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) क्षेत्रावरील जगातील पहिली सेमी हायस्पीड प्रवासी गाडी असेल. ही रेल्वे गाडी पुष्कर, अजमेर शरीफ दर्गा यासह राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळांबरोबरचे दळणवळण सुधारेल. दळणवळण सुधारल्यामुळे या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळेल.