पंतप्रधान नव्याने विद्युतीकरण केलेला रेल्वे विभाग देशाला समर्पित करून उत्तराखंड 100% ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शन’ राज्य म्हणून घोषित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 मे रोजी सकाळी 11 वाजता डेहराडून ते दिल्ली यादरम्यानच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
जागतिक दर्जाच्या सुविधांसह, उत्तराखंडमध्ये धावणारी ही पहिले वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. या रेल्वेमुळे विशेषत: राज्यात प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी आरामदायी प्रवासाचा अनुभव घेण्याच्या एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे.स्वदेश निर्मित ही रेल्वे कवच तंत्रज्ञानासह प्रगत सुरक्षा सुविधांनी सुसज्ज आहे.
सार्वजनिक वाहतुकीचे स्वच्छ, पर्यावरणपुरक साधन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीपासून प्रेरणा घेत, भारतीय रेल्वेकडून देशातील रेल्वे मार्गांचे पूर्णपणे विद्युतीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दिशेने पुढे जाताना, पंतप्रधान उत्तराखंडमधील नवीन विद्युतीकरण केलेल्या रेल्वे विभागाचे लोकार्पण करतील. त्याचबरोबर, राज्यातील संपूर्ण रेल्वे मार्ग 100% विद्युतीकृत होईल. ‘इलेक्ट्रीफाईड सेक्शनवर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन’ ने चालवल्या जाणार्या प्रवासी गाड्यांमुळे प्रवासाचा वेग वाढेल, वेळेची बचत होईल आणि वाहतूक क्षमताही वाढेल.