पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. यावेळी पंतप्रधान या उमेदवारांना संबोधितही करणार आहेत.
हा रोजगार मेळा देशभरात 46 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या सर्व नियुक्त्या केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उपक्रमात केल्या जाणार आहेत. देशभरातून निवडले गेलेले नवीन कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये आणि सरकारच्या विभागांमध्ये रुजू होतील.
रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात योगदानासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.
नव्याने नियुक्त केलेल्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल कर्मयोगी प्रारंभ द्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळत आहे. या पोर्टलवर 680 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम ‘कोठेही, कोणत्याही डिव्हाइसवर’ शिकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.