पंतप्रधान नरेंद्र मोदी द एनर्जी अँड रिसोर्सेस (टेरी) या संस्थेच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेमध्ये 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उद्घाटनपर भाषण करणार आहेत.
जागतिक शाश्वत विकास परिषद हा टेरी या संस्थेचा वार्षिक मुख्य कार्यक्रम आहे. “एका भक्कम ग्रहासाठी- शाश्वत आणि न्याय्य भविष्याची हमी” हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे. या परिषदेमध्ये हवामान बदल, शाश्वत उत्पादन, उर्जा संक्रमण, जागतिक सामाईक आणि संसाधन सुरक्षा अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. 16 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या या तीन दिवसांच्या परिषदेमध्ये डोमिनिकन प्रजासत्ताकाचे अध्यक्ष लुई अबिनादेर, गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली, संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमिना जे मोहम्मद, विविध आंतरसरकारी संघटनांचे प्रमुख, बारापेक्षा जास्त देशांचे मंत्री/राजदूत आणि 120 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.