पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता द्वारका, नवी दिल्ली येथे 'यशोभूमी' इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (आयआयसीसी), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करतील. पंतप्रधान यावेळी द्वारका सेक्टर 21 आणि यशोभूमी द्वारका सेक्टर 25 येथील नवीन मेट्रो स्थानक यांना जोडणाऱ्या दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस मार्गाच्या विस्तारित मार्गीकेचे उद्घाटनही करतील.
द्वारका येथील ‘यशोभूमी’ कार्यान्वित झाल्यावर, आपल्या देशात बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन साकार होईल.
या एकूण प्रकल्पाने 8.9 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापले असून, 1.8 लाख चौरस मीटर क्षेत्रावरील ‘यशोभूमी’ची गणना जगातील सर्वात मोठ्या MICE (मीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन), बैठका, परिषदा आणि प्रदर्शन सुविधांमध्ये होईल.
सुमारे 5400 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ‘यशोभूमी’, भव्य परिषद केंद्र, अनेक प्रदर्शन दालने आणि अन्य सुविधांनी सुसज्ज आहे.
73 हजार चौरस मीटर पेक्षा जास्त परिसरात उभारण्यात आलेल्या परिषद केंद्रात मुख्य सभागृहासह, भव्य बॉलरूम आणि एकूण 11,000 प्रतिनिधी क्षमतेच्या 13 बैठक कक्षांसह 15 परिषद दालनांचा समावेश आहे. परिषद केंद्रात देशातील सर्वात मोठी LED मिडिया दर्शनी भाग (स्क्रीन) आहे. परिषद केंद्रामधील सभागृह सुमारे 6,000 आसन क्षमतेने सुसज्ज आहे. सभागृहात सर्वात नवोन्मेशी आसन व्यवस्था आहे. यामध्ये सपाट जमिनीवर आवश्यकते नुसार आसनांची रचना करता येईल किंवा ऑडीटोरीयम प्रमाणेही रचना करता येईल.प्रेक्षागाराची लाकडी जमीन आणि भिंतीवरील श्रवण पॅनेल इथे भेट देणाऱ्यांना जागतिक तोडीचा अनुभव देईल. पाकळ्यांच्या आगळ्या वेगळ्या रचनेमधील छताची भव्य बॉलरूम जवळजवळ 2,500 पाहुणे सामावून घेईल. या ठिकाणी 500 आसन क्षमतेची विस्तारीत मोकळी जागाही ठेवण्यात आली आहे. आठ मजल्यांवरील विविध क्षमतेच्या 13 बैठकीच्या खोल्या विविध स्वरूपाच्या बैठकी आयोजित करण्यासाठी सुसज्ज आहेत.
या ‘यशोभूमी’ केंद्रामध्ये जगातील काही सर्वात मोठ्या प्रदर्शन दालनांपैकी दालनही आहे. सुमारे 1.07 लाख चौरस मीटरहून मोठ्या क्षेत्रफळावर बांधण्यात आलेल्या या दालनांचा वापर विविध प्रदर्शने, व्यापारी मेळावे तसेच व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी होणार आहे. ही दालने भव्य अशा स्वागत दालनाशी जोडलेली असतील तांब्याच्या छतासह या कक्षाची रचना अत्यंत अभिनव पद्धतीने करण्यात आली असून त्याच्या विविध स्कायलाईटच्या माध्यमातून ही संपूर्ण जागा उजळण्यात आली आहे. स्वागतदालनात माध्यम कक्ष, अत्यंत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विश्रामकक्ष, कपडेविषयक सुविधा, अभ्यागतांच्या माहितीची नोंद ठेवणारे केंद्र, तिकीट काढण्याची व्यवस्था यांसह इतर अनेक सुविधांसाठी विहीत जागा असतील.
‘यशोभूमी’ केंद्रातील जनतेच्या परिभ्रमणासाठी असलेल्या सर्व जागा अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत की जेणेकरून त्यामध्ये या केंद्राच्या बाह्य जागांशी सातत्य राखले जाईल. भारतीय संस्कृतीपासून प्रेरणा घेतलेले साहित्य आणि वस्तू वापरून येथील सजावट केलेली आहे. रांगोळीच्या नमुन्यांचे दर्शन घडवणाऱ्या पितळेच्या वस्तूंसह टेराझो प्रकारच्या जमिनीची रचना, ध्वनी शोषक धातूच्या लटकवलेल्या नळकांड्या तसेच नमुनेदार, प्रकाशित भिंती या ठिकाणी पाहायला मिळतात.
सांडपाण्याचा संपूर्णतः म्हणजे 100% पुनर्वापर शक्य करणारी अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे तसेच पर्जन्य जलसंधारण करण्याची सुविधा यांसारख्या सोयींमुळे ‘यशोभूमी’ मधून शाश्वततेप्रती असलेल्या सरकारच्या सशक्त वचनबद्धतेचे दर्शन घडते. या केंद्र परिसराला सीआयआयच्या भारतीय हरित इमारत मंडळाकडून (आयजीबीसी)प्लॅटिनम श्रेणीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे.
या ‘यशोभूमी’ केंद्राला भेट देणाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे केंद्र उच्च पातळीवरील तंत्रज्ञानयुक्त संरक्षण विषयक सुविधांनी सुसज्जित देखील करण्यात आले आहे. येथील सुमारे 3,000 हून अधिक मोटारी पार्क करण्याची क्षमता असलेल्या भूमिगत कार पार्किंग सुविधेच्या ठिकाणी 100 इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटची देखील सोय आहे.
‘यशोभूमी द्वारका सेक्टर 25’ या नव्या मेट्रो स्थानकाच्या उद्घाटनामुळे आता हे ‘यशोभूमी’ केंद्र दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस मार्गाला जोडले जाणार आहे. नव्या मेट्रो स्थानकामध्ये तीन भुयारी मार्ग असतील- स्थानक आणि प्रदर्शन दालने, संमेलन केंद्र आणि मध्यवर्ती भाग यांना जोडणारा 735 मीटर लांबीचा भुयारी मार्ग; द्वारका द्रुतगती मार्गाच्या आगमन/निर्गमन बिंदूंना जोडणारा आणखी एक भुयारी मार्ग आणि तिसरा भुयारी मार्ग म्हणजे ‘यशोभूमी’च्या प्रदर्शन दालनांच्या स्वागत दालनाला मेट्रो स्थानकाशी जोडणारा भुयारी मार्ग.
दिल्ली मेट्रो आपला वेग वाढवून विमानतळ एक्स्प्रेस मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांचा वेग प्रतितास 90 किमी वरुन प्रतितास 120 किमी इतका करेल आणि त्यातून प्रवासाच्या वेळेची बचत होईल. ‘नवी दिल्ली’ मेट्रो स्थानक ते ‘यशोभूमी द्वारका सेक्टर 25’ मेट्रो स्थानक यांच्या दरम्यानच्या प्रवासाला सुमारे 21 मिनिटे लागतील.