पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी सकाळी11वाजता व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे कोची- मंगळुरू गॅस पाईपलाईन प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. हा कार्यक्रम ‘वन नेशन वन गॅस ग्रिड’ निर्मितीच्या दिशेने ठरवलेला महत्वपूर्ण टप्पा आहे.केरळ आणि कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पाईपलाईन बद्दल
ही 450 किलोमीटर लांबीची पाईपलाईन गेल इंडिया लिमिटेड या कंपनीने तयार केली आहे. दररोज 12 दशलक्ष मेट्रीक स्टँडर्ड क्यूबिक मीटर इतकी वाहतूक करण्याची याची क्षमता असून तिच्याद्वारे कोची(केरळ) येथील रिगॅसिफीकेशन टर्मिनल पासून एरनॅक्यूलम,थ्रीसूर,पलक्कड,मल्लपूरम,कोझिकोडी,कन्नूर,आणि कासारगोड या जिल्ह्यांतून जात मंगळुरू( कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हा) पर्यंत लिक्विफाईड नॅचरल गॅस नेला जाईल. या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये इतकी होती आणि त्यामुळे 12 लाख मानवी दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला. ही पाईपलाईन टाकण्याचे काम अभियांत्रिकी आव्हानात्मक होते कारण पाईपलाईनच्या मार्गावर 100 पेक्षा अधिक ठिकाणी जलसाठा ओलांडून जाण्याची आवश्यकता होती. होरीझाँटल डिरेक्शनल ड्रिलींग पध्दत या विशेष तंत्राद्वारे हे काम करण्यात आले.
या पाईपलाईनमुळे घराघरांत पर्यावरण अनुकूल आणि परवडणारे इंधन पाईप नॅचरल गॅस स्वरूपात पुरविण्यात येणार असून वाहतूक क्षेत्राला काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस मिळेल. तसेच या पाईपलाईनवरून जिल्ह्यांतील व्यावसायिक आणि औद्योगिक घटकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा होईल. अशा स्वच्छ इंधनाच्या वापराने वायूप्रदूषणाला आळा बसून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होईल.