जागतिक जैवइंधन दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हरियाणातील पानिपत येथे 2G इथेनॉल संयंत्र राष्ट्राला समर्पित करतील.
देशात जैवइंधनाचे उत्पादन आणि वापराला चालना देण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या अनेक उपाययोजनांच्या मालिकेचा हा भाग आहे. ऊर्जा क्षेत्राला अधिक किफायतशीर, सुगम्य, कार्यक्षम आणि शाश्वत बनवण्याच्या पंतप्रधानांच्या निरंतर प्रयत्नांच्या अनुरूप हे आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे अंदाजे 900 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे 2G इथेनॉल संयंत्र उभारण्यात आले असून पानिपत रिफायनरीच्या जवळ आहे. अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित, हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 3 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे 2 लाख टन पेंढा (परली ) वापरून कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय सुरु करेल.
कृषी-पिकांच्या अवशेषांचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम बनवले जाईल तसेच त्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळेल. या प्रकल्पामुळे संयंत्र परिचलनात सहभागी असलेल्या लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि पेंढा कापणे, हाताळणी, साठवणूक आदी साठी पुरवठा साखळीत अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केला जाईल.
या प्रकल्पात शून्य द्रव विसर्जन असेल. धानाचा पेंढा (परली ) जाळण्याचे प्रमाण कमी करून, हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 3 लाख टन कार्बन डायऑक्साईड समतुल्य उत्सर्जनाच्या समतुल्य हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यात योगदान देईल. म्हणजेच देशातल्या रस्त्यांवरून दरवर्षी सुमारे 63,000 गाड्या हटवण्यासमान हे आहे.