पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 सुरु झाल्याची घोषणा करतील.
देशात क्रीडा संस्कृती विकसित करण्यावर आणि युवकांना खेळासाठी प्रोत्साहित करण्यावर पंतप्रधानांनी नेहमीच भर दिला आहे. नवोदित खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत आणि देशातील क्रीडा व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
यावर्षी, तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा उत्तर प्रदेशमध्ये 25 मे ते 3 जून दरम्यान होणार आहेत. या स्पर्धांचे वाराणसी, गोरखपूर, लखनौ आणि गौतम बुद्ध नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये 200 हून अधिक विद्यापीठांमधील 4750 हून अधिक खेळाडू 21 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होतील. वाराणसी येथे 3 जून रोजी या क्रीडास्पर्धांचा समारोप सोहळा होणार आहे.
या क्रीडा स्पर्धांच्या शुभंकराचे नाव जितू आहे असून तो दलदलीतील हरीण (बाराशिंगा) या उत्तर प्रदेशच्या राज्य प्राण्याचे प्रतिनिधित्व दर्शवतो.