पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-21 नोव्हेंबर 2021 रोजी लखनौ मधील पोलीस मुख्यालय येथे पोलीस महासंचालक (DGP) आणि पोलीस महानिरीक्षक (IGP) यांच्या 56 व्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसीय परिषद हायब्रीड अर्थात आभासी आणि प्रत्यक्ष स्वरूपात होणार आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांचे प्रमुख आणि केंद्रीय पोलिस संघटना लखनौ येथील परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित राहतील, तर उर्वरित निमंत्रित व्यक्ती IB/SIB मुख्यालयात 37 वेगवेगळ्या ठिकाणांहून व्हर्चुअली सहभागी होतील. सायबर गुन्हे, डेटा गव्हर्नन्स, दहशतवादविरोधी आव्हाने, नक्षलवाद , अंमली पदार्थांच्या तस्करीचे वाढते प्रमाण, तुरुंगातील सुधारणा यासह विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
2014 पासून पंतप्रधानांनी पोलीस महासंचालकांच्या परिषदेबाबत विशेष उत्सुकता दाखवली आहे. पूर्वीच्या प्रतिकात्मक उपस्थितीच्या ऐवजी परिषदेच्या सर्व सत्रांना उपस्थित राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि मुक्त आणि अनौपचारिक चर्चेला प्रोत्साहन देतात. यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पंतप्रधानांना पोलीस तैनातीविषयी आणि देशावर परिणाम करणाऱ्या अंतर्गत सुरक्षेच्या मुख्य मुद्यांबाबत थेट माहिती देण्याची संधी मिळते.
वार्षिक परिषदा, ज्या पारंपरिकपणे दिल्लीत आयोजित केल्या जात होत्या, त्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानुसार , 2014 पासून 2020 चा अपवाद वगळता दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आल्या आहेत, 2020 मध्ये ही परिषद दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. 2014 मध्ये गुवाहाटी येथे ; 2015 मध्ये धोर्डो, कच्छचे रण येथे ; 2016 मध्ये राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे ; 2017 मध्ये बीएसएफ अकादमी, टेकनपूर येथे ; 2018 मध्ये केवडीया ; आणि 2019 मध्ये IISER, पुणे येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.