नवी दिल्लीतल्या करिअप्पा परेड ग्राऊंडवर उद्या होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे.
यावेळी पंतप्रधान एनसीसीच्या पथसंचलनाचे निरीक्षण करतील आणि विद्यार्थ्यांकडून मानवंदना स्वीकारतील. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमासह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी साहसी खेळ, संगीत आणि इतर कलाप्रकारांचे प्रदर्शनही पंतप्रधानांसमोर करतील.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील आणि त्यानंतर पंतप्रधानांचे भाषण होईल.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी एनसीसीचे विद्यार्थी नवी दिल्लीत येतात. गेल्यावर्षीही पंतप्रधानांनी एनसीसीच्या रॅलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय आपत्तींच्यावेळी एनसीसी विद्यार्थी देत असलेल्या सेवेबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच स्वच्छ भारतसारख्या अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही केले होते.