शिलाँगच्या नॉर्थ इस्टर्न इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये देशातील 7500 व्या जनौषधी केंद्रांचे पंतप्रधान करणार लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 मार्च 2021 रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनऔषधी दिवस सोहळ्याला संबोधित करतील. या सोहळ्यात पंतप्रधान शिलाँगच्या नॉर्थ इस्टर्न इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये देशातील 7500 व्या जनौषधी केंद्रांचे लोकार्पण करतील. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना लाभार्थ्यांशी पंतप्रधान यावेळी संवाद साधतील तसेच उत्कृष्ट कामाबद्दल संबंधितांना पारितोषिक वितरण करतील. खते आणि रसायने खात्याचे केंद्रीय मंत्री या समारंभाला उपस्थित राहतील.
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना
दर्जेदार औषधे किफायतशीर किमतीत पुरविण्याच्या उद्देशाने या योजनेला प्रारंभ झाला. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत 7499 औषध दुकाने उघडली गेली आहेत. आर्थिक वर्ष 2020-2 (4 मार्च 2021 पर्यंत) झालेल्या विक्रीचे आकडे बघता, बाजारातील औषधांपेक्षा 50 टक्के ते 90 टक्के पर्यंत स्वस्त असलेल्या या औषधांमुळे सामान्य नागरिकांची जवळपास 3600 कोटी रुपयांची बचत झाली आहे
जनौषधी दिवसाबद्दल
जनौषधी बद्दल जनजागृती करण्यासाठी 1 मार्च ते 7 मार्च हा संपूर्ण आठवडा देशभरात “जनौषधी-सेवा आणि रोजगारही” या कल्पनेसह जनौषधी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतआहे. या सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे 7 मार्च जनौषधी दिवस म्हणून साजरा होणार आहे