पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या युवा संसद महोत्सवाच्या समारोप प्रसंगी 12 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. महोत्सवाचे तीन राष्ट्रीय विजेते देखील त्यांचे मनोगत या कार्यक्रमादरम्यान व्यक्त करतील. लोकसभेचे सभापती, केंद्रिय शिक्षण मंत्री आणि युवा कार्य व क्रीडा संघटनांचे केंद्रीय मंत्री (अतिरिक्त कार्यभार) देखील या समारंभास उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव
नागरी सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये येत्या काही वर्षात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आणि ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा 18 ते 25 या वयोगटातील युवकांची मते ऐकण्यासाठी राष्ट्रीय युवा संसद महोत्सव (National Youth Parliament Festival – NYPF) याचे आयोजन केले जाते. NYPF ही मूळ संकल्पना पंतप्रधानांनी 31 डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या मन की बात या उपक्रमाच्या भाषणामध्ये मांडली होती. या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन पहिला एनवायपीएफ 17 ते 29 जानेवारी 2019 या काळात ‘बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड सोल्युशन अँड कॉन्ट्रिब्यूट टू पॉलिसी’ (नव्या भारताचा आवाज बना आणि मार्ग शोधा आणि यंत्रणेत सहभागी व्हा) या विषयाला अनुसरून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एकूण 88,000 युवकांनी भाग घेतला होता.
दुसऱ्या एनवायपीएफला 23 डिसेंबर 2020 रोजी व्हर्च्युअल पद्धतीने (आभासी माध्यमातून) प्रारंभ झाला. देशभरातून 2.34 लाख युवकांनी याच्या पहिल्या टप्प्यात भाग घेतला. त्यापाठोपाठ राज्य युवा संसद देखील व्हर्च्युअप माध्यमातून 1 ते 5 जानेवारी 2021 या काळात सुरू झाली. दुसऱ्या एनवायपीएफचा अंतिम टप्पा हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 11 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय विजेत्यांना राष्ट्रीय परीक्षक राज्यसभेच्या खासदार श्रीमती रूपा गांगुली, लोकसभेचे खासदार परवेश साहिब सिंग आणि प्रख्यात पत्रकार प्रफुल्ला केतकर यांच्या समोर बोलण्याची संधी मिळणार आहे. अंतिम तीन विजेत्यांना पंतप्रधानांसमोर समारोप समारंभाच्या प्रसंगी 12 जानेवारी रोजी बोलण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सव
राष्ट्रीय युवा महोत्सव हा प्रत्येक वर्षी 12 ते 16 जानेवारी या काळात साजरा केला जातो. 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाबरोबरच ‘एनवायपीएफ’ चे देखील आयोजन करण्यात आले आहे.
युवकांना त्यांच्यातील प्रतिभा दाखविण्याची संधी मिळावी, जणू भारताचे लघुरूपच तयार करून त्यांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देणे, जेथे युवकांना औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येईल आणि आपली सामाजिक आणि सांस्कृतिक विभिन्नतेची देवाण घेवाण करता येईल. राष्ट्रीय एकत्रीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील हे आहे, जातीय सलोख्याचा आपलेपणा, बंधुभाव, धैर्य आणि साहस यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. याचा मूलभूत हेतू म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना, सार आणि संकल्पना यांचा प्रचार करणे.
कोविड- 19 मुळे, राष्ट्रीय युवा महोत्सव हा व्हर्च्युअल (आभासी) पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. ‘YUVAAH – Utsah Naye Bharat ka’ (युवा – उत्साह नये भारत का) हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे. 24 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आणि दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचा समारोप समारंभ दोन्हीही एका दिवशी म्हणजे 12 जानेवारी 2021 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. 24 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.