पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता गुजरातमधील भरूच येथे आयोजित 'उत्कर्ष समारोह' ला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. गरजूंना वेळेवर आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी सहाय्यकारी ठरणाऱ्या राज्य सरकारच्या चार महत्त्वाच्या योजनांची या जिल्ह्यात 100% टक्के पूर्तता झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विधवा, वृद्ध आणि निराधार नागरिकांना मदत उपलब्ध करून देणाऱ्या योजनांची संपूर्ण व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, भरूच जिल्हा प्रशासनाने यावर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत ‘उत्कर्ष उपक्रम' ही मोहीम राबवली. गंगा स्वरूपा अर्थिक सहाय्य योजना, इंदिरा गांधी वृद्ध सहाय्यता योजना, निराधार वृद्ध अर्थिक सहाय्यता योजना आणि राष्ट्रीय कुटुंब सहाय्यता योजना या चार योजनांचे एकूण 12,854 लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.
या मोहिमेदरम्यान, योजनांचा लाभ न मिळालेल्यांची माहिती संकलित करण्यासाठी, तालुकानिहाय व्हॉट्सअॅप मदतक्रमांक जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आणि नगरपालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये उत्कर्ष शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या अर्जदारांना त्याच ठिकाणी लाभार्थी म्हणून मान्यता देण्यात आली. ही मोहीम अधिक सुलभ करण्यासाठी उत्कर्ष सहाय्यकांना प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्यात आले.