पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावर आयोजित 17 व्या भारतीय सहकारी महासंमेलनाला संबोधित करणार आहेत.
“सहकारातून समृद्धी” या पंतप्रधानांच्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन, सरकार देशातील सहकार चळवळीला चालना देण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली. या कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग हे या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
दिनांक 1-2 जुलै, 2023 रोजी 17 व्या भारतीय सहकारी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहकारी चळवळीतील विविध कल जाणून चर्चा करणे, सर्वोत्तम पद्धतींचे सादरीकरण, चळवळीतील आव्हानांवर चर्चा आणि भारतातील सहकारी चळवळीच्या विकासासाठी भविष्यातील धोरणात्मक योजनेची आखणी, ही या महासंमेलनाची उद्दिष्टे आहेत. या महासंमेलनात “अमृत काळ : गतिमान भारतासाठी सहकारातून समृद्धी ” या मुख्य संकल्पनेवर सात तांत्रिक सत्रे असतील. यामध्ये प्राथमिक स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या सहकारी संस्था, आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे प्रतिनिधी, मंत्रालये, विद्यापीठे, नामवंत संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह 3600 हून अधिक संबंधित सहभागी होतील.