केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी ) दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त, नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे 3 नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान केंद्रीय दक्षता आयोगाच्या नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलचा आरंभ करतील. नागरिकांना त्यांच्या तक्रारींच्या स्थितीबाबत नियमित वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देणे ही या पोर्टलमागची संकल्पना आहे. "नीतिमूल्ये आणि उत्तम पद्धती "; "प्रतिबंधात्मक दक्षता"संदर्भातील सर्वोत्तम पद्धतींचे संकलन आणि सार्वजनिक खरेदीवरील विशेष अंक “विजये-वाणी” या सचित्र पुस्तिकांच्या मालिकेचेही पंतप्रधान प्रकाशन करणार आहेत.
जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रात एकात्मतेचा संदेश पोहोचवण्यासाठी सर्व हितसंबंधितांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने, केंद्रीय दक्षता आयोग दरवर्षी दक्षता जागरूकता सप्ताह आयोजित करतो. यावर्षी 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत “विकसित देशासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत ” या संकल्पनेसह हा सप्ताह साजरा केला जात आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने आयोजित केलेल्या, दक्षता जागरुकता सप्ताहाच्या यंदाच्या संकल्पनेवर आधारित देशव्यापी निबंध स्पर्धेत सर्वोत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.