पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 फेब्रुवारी 2024ला, भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024 या भारतातल्या परिवहन विषयक विशाल आणि अशा प्रकारच्या पहिल्या प्रदर्शनात एका कार्यक्रमाला संबोधित करतील. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे संध्याकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024, भारताचे संपूर्ण परिवहन क्षेत्र आणि वाहन क्षेत्रातल्या मूल्य साखळीचे दर्शन घडवेल. प्रदर्शने,परिषद, ग्राहक-विक्रेता बैठका,राज्य सत्रे,रस्ता सुरक्षा विषयक दालने आणि जनतेच्या आकर्षण स्थानी असणाऱ्या गो-कार्टिंग सारख्या इतर बाबींचाही या प्रदर्शनात समावेश राहील.
50 हून अधिक देशांमधले 800 पेक्षा जास्त प्रदर्शक यात सहभाग नोंदवणार असून हे प्रदर्शन अत्याधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत उपाययोजना आणि परिवहन क्षेत्रातल्या नव्या बाबी अधोरेखित करेल. वाहनांचे वेगवेगळे भाग निर्मिती करणाऱ्या 600 पेक्षा जास्त उत्पादकांसह 28 वाहन उत्पादक या प्रदर्शनात भाग घेतील. प्रदर्शनात 13 जागतिक बाजारपेठेतले 1000 पेक्षा जास्त ब्रँड आपली सर्व उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवा यांचे दर्शन घडवतील.
प्रदर्शन आणि परिषदा यांबरोबरच राज्यांसाठी यामध्ये राज्य सत्रेही असतील. राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर सहयोग शक्य करण्यासाठी आणि परिवहन क्षेत्रातल्या उपाययोजनांसाठी समावेशक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रादेशिक योगदान दर्शवण्यासाठी ही राज्य सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.