पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमधील जेएलएन स्टेडियम येथे संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान स्वनिधी (PM SVANidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. यावेळी ते दिल्लीमधील रस्त्यावरील 5,000 विक्रेत्यांसह (एसव्ही) 1 लाख एसव्हींना योजनेंतर्गत कर्जाचे वितरण देखील करतील.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान दिल्ली मेट्रोच्या फेज 4 च्या दोन अतिरिक्त कॉरिडॉरची पायाभरणीही करतील.
साथ रोगामुळे उद्भवलेल्या जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, वंचित घटकांना आर्थिक पाठबळ देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, 1 जून 2020 रोजी पीएम-स्वनिधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. रस्त्यावरील विक्रेत्यांच्या उपेक्षित समुदायासाठी ही योजना परिवर्तनकारी ठरली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत रु. 10,978 कोटीचे 82 लाखांहून अधिक कर्ज, वितरित करण्यात आले असून, देशभरातील 62 लाखांहून अधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. एकट्या दिल्लीत सुमारे 2 लाख कर्जांचे वितरण झाले असून, त्याची रक्कम रु. 232 कोटी इतकी आहे. ही योजना आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या वर्गाच्या समावेशाचा आणि सर्वांगीण कल्याणाचा दीपस्तंभ ठरली आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान दिल्ली मेट्रोच्या लाजपत नगर – साकेत-जी ब्लॉक आणि इंद्रलोक – इंद्रप्रस्थ, या दोन अतिरिक्त कॉरिडॉरची पायाभरणी करतील. हे दोन कॉरिडॉर एकत्रितपणे 20 किमी पेक्षा जास्त लांबीचे आहेत आणि ते दिल्लीमधील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपयोगी ठरतील.
लाजपत नगर ते साकेत जी-ब्लॉक कॉरिडॉर मध्ये पुढील स्थानकांचा समावेश असेल: लाजपत नगर, अँड्र्यूज गंज, ग्रेटर कैलाश–1, चिराग दिल्ली, पुष्प भवन, साकेत जिल्हा केंद्र, पुष्प विहार, साकेत जी–ब्लॉक. इंद्रलोक-इंद्रप्रस्थ कॉरिडॉरमध्ये पुढील स्थानकांचा समावेश असेल: इंदर लोक, दया बस्ती, सराय रोहिल्ला, अजमल खान पार्क, नबी करीम, नवी दिल्ली, एलजेपी रुग्णालय, दिल्ली गेट, दिल्ली सचिवालय, इंद्रप्रस्थ.