नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित पहिल्या अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांच्या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता मार्गदर्शन करणार आहेत
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने (एनएलएएसए) विज्ञान भवन येथे 30-31 जुलै 2022 दरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांचे (डीएलएसए) पहिले राष्ट्रीय स्तरावरील संमेलन आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांमध्ये एकसमानता आणि समन्वय आणण्याच्या अनुषंगाने एकात्मिक कार्यपद्धती तयार करण्यावर या संमेलनात चर्चा केली जाईल.
देशात एकूण 676 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे (डीएलएसए) आहेत. प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेल्या जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या प्राधिकारणांचे कार्य चालते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे (डीएलएसए) आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण (एसएलएसए) मार्फत विविध कायदेशीर मदत आणि जागरूकता कार्यक्रम राबवले जातात. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित लोकअदालतींचे नियमन करून न्यायालयांवरील भार कमी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे देखील योगदान देतात.